योग या शब्दाचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे.योग हा व्यायामाचा एक असा प्रभावशाली प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधीलच नाही तर मन, शरीर आणि आत्मा यांच्यातील संतुलन राखले जाते. योगाभ्यासामुळे शारीरिक व्याधींबरोबरच मानसिक विकारांवर सुद्धा विजय मिळवता येऊ शकतो.
योग या शब्दाची उत्पत्ती युज या संस्कृत शब्दापासून झाली आहे. याचा अर्थ आत्म्याचा परमात्म्याशी संयोग किंवा आत्म्याचा चराचरात व्यापून उरलेल्या चेतनेशी संयोग. योग पद्धती जवळपास दहा हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून आचरणात आणला जाते आहे. वैदिक संहितांनुसार तपस्वी, ऋषी यांच्या संदर्भात प्राचीन काळापासून योगाभ्यासाचे संदर्भ आढळतात.
हिंदू धर्मात साधू, संन्यासी आणि योगी सुरुवातीपासूनच योगमार्गाचे आचरण करतात मात्र सामान्य लोकांचा याच्याशी फारसा संबंध नव्हता. अलीकडेच सामान्यांमध्ये स्वस्थ, निरोगी, शांततापूर्ण जगण्यासाठी योगाभ्यासाचे महत्त्व वाढते आहे. कारण आजकालची तणावपूर्ण जीवनशैली ही सर्वसामान्यांची दिनचर्या बिघडवून टाकत आहे.आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये मनःशांती टिकवून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग.योगाभ्यासात शारीरिक कृती आणि योग्य पद्धतीने श्वास घेणे यांचा अभ्यास केला जातो. शरीर, मन आणि आत्मा हे शरीराचे तीन मुख्य घटक. यांच्यातील परस्पर संबंधांचे नियमितीकरण असणे आवश्यक असते. दर दिवशी नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होऊन आपल्याला अंतर्बाह्य आराम मिळतो. योगातील विविध आसनांमधून मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते.
योगाभ्यासातून बौद्धिक पातळी सुधारते आणि आपण आपल्या भावना स्थिर ठेवून एकाग्र होऊ शकतो. योगाभ्यासातून स्व-अनुशासन साधले जाते. योगाभ्यासाचे हे फायदे लक्षात घेऊन २१ जून २०१५ साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे. योग हे मेंदू आणि शरीराच्या एकतेचं प्रतीक आहे. मनुष्य आणि प्रकृती यांच्यात सामंजस्य आहे.योग हा विचार, संयम आणि पूर्णत्व प्रदान करणारा आहे त्याचप्रमाणे प्रकृतीस्वास्थ्यासाठी आणि विश्वाच्या भल्यासाठी एक समग्र दृष्टिकोण प्रदान करणारा आहे.
योगाभ्यासाचा आग्रह हा फक्त व्यायामापुरता नाही तर स्वतःच्या आत एक एकात्मतेची भावना जागवण्यासाठी आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीमध्ये योग हा चेतना बनून, आपल्या परिस्थितीतील बदलाशी जुळवून घ्यायला आपल्याला मदत करू शकतो.
२१ जून हाच योग दिवस का ?
आंतरराष्ट्रीय योग दिवस हा २१ जूनला साजरा करण्यामागे वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी दोन्हीही कारणे आहेत. खगोलशास्त्र असे सांगते की सूर्याच्या दोन स्थिती असतात. उत्तरायण आणि दक्षिणायन. जून महिन्याच्या २१ तारखेला सूर्य आपली स्थिती बदलतो म्हणजेच उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. हा एक नैसर्गिक बदल आहे. जेव्हा सूर्याचे दक्षिणायन सुरू होते तेव्हा सूर्याचा प्रकाश आणि उष्णता कमी होते. यामुळे वातावरणात बदल होऊ लागतो.
याने अनेक रोगांचे आणि आजारांचे उगमस्थान असलेले जीवजंतू, सूक्ष्मजीव आपलं काम करायला सुरुवात करतात आणि माणसं आजारी पडण्याचे प्रमाण वाढायला सुरुवात होते.
योगासनांचा आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे आपल्या शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे. याच कारणाने या वातावरणीय बदलाचा पहिला दिवस हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जूनला साजरा केला जातो.